कोण होत्या डॉ. शीतल आमटे; वाचा त्यांचा हा अचंबित करणारा प्रवास

मुंबई :

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची माहिती दैनिक लोकमतने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

कोण होत्या डॉ. शीतल आमटे :-

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांची कन्या होत्या. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.  शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या.

शैक्षणिक आणि इतर प्रवास :-

2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं. त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे ‘यंग ग्लोबल लीडर 2016’ साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी घडलेला धक्कादायक प्रकार :-

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.  त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती.

मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here