पक्षसंघटनाच्या कार्यक्रमातच नगरचे भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले; ‘असे’ घडले मजबूत संघटनाचे दर्शन

अहमदनगर :

भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणारा एकसंघ असलेला पक्ष आहे. भाजपचा आजही पक्षसंघटन करण्यावर मोठा जोर असतो. म्हणूनच अगदी मोठ्या शहरापासून तर छोट्या खेड्यांपर्यंत भाजप पक्ष वाढताना दिसत आहे. अशातच अहमदनगरमध्ये चालू असलेल्या भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत भाजप जेष्ठ कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि घडले मजबूत पक्ष संघटनाचे दर्शन घडले.  

करोनाच्या काळात पक्षाने काय केले? या विषयावरुन सुरू झालेला वाद हातापाईवर येऊन थांबला.   पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर व माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्यात वाद पेटला. पेमराज सारडा महाविद्यालयात कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. मात्र ज्येष्ठ नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यावर पडदा पडला.

ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी संधी दिली जाणार आहे की नाही? असा सवाल मुकुंद देवगावकर यांनी केला. नंतर आम्ही करोनाच्या काळात खूप काम केले. पक्षाने काय काम केले, ते आधी सांगावे. पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले आहेत. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत, अशांना पदे दिली आहेत. त्यामुळे पक्षशिस्त बिघडली आहे. आणि तुम्ही मात्र पक्षशिस्त काय असते, हे शिकवता, असे मुकुंद देवगावकर यांनी विचारले. नंतर या वादात नरेंद्र कुलकर्णी यांनी उडी घेतली एमजी कुलकर्णी-देवगावकर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला.

सध्या भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. नगर शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील चारही मंडलांतील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. करोनाच्या भीतीने साधारणतः शंभरच्या आसपास कार्यकर्त्यांनी शिबिराला हजेरी लावली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here