शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल; ‘ती’ गोष्ट नव्या अराजकाला आमंत्रण देणारी

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात पंजाब शेतकरी आंदोलन आणि केंद्राच्या यंत्रणा या विषयावर भाष्य करत भाजपवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱयांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱयांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील. चीनचे सैन्य हिंदुस्थानी हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे.

त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवण्यात आले आहे. नुसतेच अडवले नाही, तर त्यांच्यावर बळाचा, साम- दाम-दंड-भेदाचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतकऱयांचे हे आंदोलन आहे. शेतकऱयांना दिल्लीतील रामलीला मैदानावर जायचे आहे, पण केंद्राने लाठय़ाकाठय़ा, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱयांवर थंड पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे.

तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते. आता शेतकरी ऐकत नाहीत व केंद्र सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हंगामा करीत आहेत म्हटल्यावर भाजपने व केंद्रीय यंत्रणांनी त्यांचे नेहमीचे जंतर मंतर, जादुई हातचलाखीचे प्रयोग सुरू केले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे बेताल विधान केले की, शेतकऱयांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. म्हणजेच शेतकऱयांचे आंदोलन देशद्रोही आहे.

हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकड यांनी तर असाही दावा केला की, शेतकऱयांचा आंदोलनात ”पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा दिल्या. तशी एक क्लिपच म्हणे जारी केली. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारीदेखील आहे. खलिस्तानचा विषय संपला आहे. त्या अंधारयुगातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांनी प्राणांचे बलिदान दिले, पण खलिस्तानचा विषय आज भाजपवाले नुसते उकरून काढत नाहीत तर त्यांना ती ठिणगी टाकून पंजाबात स्वतःचे राजकारण सुरू करायचे आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here