शरद पवारांनी दिली होती राष्ट्रपती राजवटीची आयडिया; पवारांनी केला मोठा गेम; ‘असा’ होता प्लान, ‘या’ पुस्तकात धक्कादायक खुलासे

असे म्हणतात की राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार तयार केली केली जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही असेच काही घडले. जेव्हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपची सत्ता गेली व महा विकास आघाडी सरकार स्थापन झाले.

त्याआधीच्या राजकीय घडामोडी, ज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्व घटनांनी महाराष्ट्रातील लोक आश्चर्यचकित झाले.  दरम्यान नवभारत टाईम्सने यावर स्पेशल रिपोर्ट बनवत अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत.

जेव्हा शरद पवारांना भाजपबरोबर सरकार बनवायचे होते :-

जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात निर्णय झाला की ते यापुढे एकत्र सरकार बनवणार नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली आयडिया केली आणि भाजपला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव पाठविला. राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे शरद पवार यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचे होते.

यासाठी त्यांनी अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती आणि जवळजवळ सर्व काही निश्चित झाले होते. कोणतं मंत्रालय कुणाला द्यायचं. मंत्रालयांचे विभाजन कसे करावे. या सर्व बाबींचा निर्णय दिल्लीतील त्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी याचा खुलासा केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर त्यांनी ‘ट्रेडिंग पॉवर’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. नवभारत टाईम्सशी बोलत असताना त्यांनी अनेक महत्वाच्या बाबतीत खुलासे केले.

शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची आयडिया दिली :-

प्रियम यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप यांच्यात जेव्हा सत्ता सामायिकरण फॉर्म्युला ठरविण्यात आला. मग एक प्रश्न पडला की जनतेला काय सांगितले जाईल. मग शरद पवार म्हणाले की आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात मदत करू.

त्यानंतर पवार दहा दिवस महाराष्ट्र दौर्‍यावर येतील व नंतर माध्यमांशी बोलतील असेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना शरद पवार हे सांगतील की महाराष्ट्राला स्थिर सरकार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत.

शरद पवारांनी नंतर आपले मन आणि मत बदलले

लेखक प्रियम म्हणाले की, काही दिवसांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत बदलले आणि भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्य निर्णयाचा त्यांच्याच पक्षात तीव्र विरोध होता. भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन करावे अशी पक्षाच्याच अनेक नेत्यांची इच्छा होती.

त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भेट घेतली आणि त्यांनी शरद पवार यांना आता भाजपशी युती करण्याची इच्छा नसल्याची माहिती दिली. पण उर्वरित पक्षाच्या नेत्यांना भाजपबरोबर जायचे आहे आणि अजितदादांनीही भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. म्हणून तुम्ही अजित पवार यांना संपर्क करा आणि आमच्या आधीच्या प्लान नुसार पुढे जा.

पवार दोन बोटींवर बसले होते :-

प्रियम यांनी आपल्या पुस्तकात शरद पवार यांना एकीकडे भाजपबरोबर सरकार बनवायचे होते आणि त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे शरद पवार हे कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सतत संपर्कात होते.

शिवसेना आणि कॉंग्रेस शरद पवारांना बरीच पॉवर देण्यास तयार होते. मात्र भाजपसोबत गेल्यावर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पवारांना सतत ताळमेळ घालावा लागला असता. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापन केले.

अजित पवार गेले स्वतःच्या प्लाननुसार :-

अजितदादांना जेव्हा कळले की शरद पवार आता कॉंग्रेस आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत जुन्या प्लाननुसार राजभवनात जाऊन सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या घटनेनंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी अजितदादांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने त्यांच्यासाठीही एक स्वतंत्र स्थान बनविले. जेणेकरून जेव्हा त्यांना परत यायचे असेल तेव्हा त्यांचे स्वागत होईल.

शिवसेनेचा दावा खोटा  :-

युती तोडण्यासाठी शिवसेना भाजपवर दोषारोप ठेवत असल्याचा शिवसेनेचा दावाही प्रियम यांनी फेटाळून लावला आहे. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने सहमती दर्शविली होती पण आता तो आपले शब्द मागे घेत आहे, असे शिवसेनेने म्हटले होते.

यावर प्रियम यांनी म्हटले की, असा एकही साक्षीदार नाही, ज्यासमोर भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबद्दल कमिटमेंट दिली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here