सावधान! बँकेशी संबंधित कोणतेही कामे आजचं घ्या करून, उद्या नाही शक्य, कारण…

मुंबई :

26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कामगार संघटनांद्वारे (Central Trade Unions) देशव्यापी संप केला जाईल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच तीन नवीन कायदे केले आहेत आणि 27 जुने कायदे रद्द केले आहेत, त्या विरोधात हा संप केला जात आहे. भारतीय मजदूर संघ वगळता 10 केंद्रीय कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी सर्वसाधारण संप जाहीर केला आहे.

बँकेशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असल्यास, आजच (बुधवार 25 नोव्हेंबर) पूर्ण करा. कारण उद्या (गुरुवार 26 नोव्हेंबर) देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना सूचना दिली आहे. एआयबीईए ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता बहुतांश बँकांचे प्रतिनिधित्व करते. विविध सार्वजनिक आणि जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांसह काही परदेशी बँकांचे चार लाख कर्मचारी त्यांचे सदस्य आहेत.

AIBEA ने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली हे विद्यमान 27 कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नव्या कामगार कायद्यांतर्गत या कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळणार नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here