त्यावेळी सत्यजित तांबेंसाठी अहमद पटेलांनी केला रात्री १ ला ठाकरेंना फोन; वाचा, खुद्द तांबेंनी सांगितलेला जबरदस्त किस्सा

अहमदनगर :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झालं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आता त्यांच्या अनेक आठवणी कॉंग्रेस नेते आणि इतर राजकीय मंडळी सांगत आहेत. दरम्यान युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही एक आठवण सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तांबे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, एका पर्वाचा अंत… राजकारणातील चाणक्य अहमदभाई यांच्या निधनाच्या बातमीने मन सुन्न झाले. सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकून घेणारे, मध्यरात्री पर्यंत कार्यालयात बसून लोकांना भेटणारे, देशातील रथी-महारथींपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना आपलेसे वाटणारे अहमद भाई गेलेत. भावपूर्ण श्रध्दांजली.

पुढे त्यांनी सांगितले की, ‘खास माझ्यासाठी अहमद पटेल यांनी रात्री 1 वाजता तत्कालिन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना फोन केला होता. त्यांच्यासाठी पार्टीचा छोटा कार्यकर्ता आणि नेता समानच असायचा. पक्षातल्या सगळ्या लोकांच्या शंकांचं निरसन ते अगदी खुबीने करायचे. त्यांच्या जाण्याने आमच्यासाठीचं हक्काचं ठिकाण आम्ही कायमस्वरुपी गमावलं.

‘अहमदनगर जिल्हा परिषदेला 2009 साली मला अध्यक्ष व्हायचं होतं. तशी तयारी सुरु होती. परंतु तत्कालिन काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे ते शक्य नसल्याचं दिसत होते. पक्षातलीही बरीच माणसं माझं फक्त म्हणणं ऐकून घेत होती परंतु कार्यवाही मात्र होत नव्हती. मग मी अहमद पटेल यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
अहमदभाईंची रात्री 1 वाजता मला अपॉइंटमेंट मिळाली. रात्री 1 वाजता त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी माझी नेमकी अडचण समजून घेतली. मी माझी सविस्तर अडचण त्यांच्या कानावर घातली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी थेट तत्कालिन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना फोन लावला. त्यावेळी माणिकराव ठाकरे कदाचित झोपले असावेत. त्यामुळे त्यांना आवाज ओळखू आला नसेल. कोण बोलतंय म्हणून ठाकरेंनी तीन वेळा विचारलं… त्यावर मैं अहमदभाई पटेल बोल रहाँ हूँ …

त्यानंतर मूळ विषयाला हात घालत अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी तांबेंना का संधी देत नाही? असं अहमद पटेल यांनी माणिकराव ठाकरेंना विचारलं. त्यावर ‘साहाब ओ लडका NSUI का लडका हैं… उमर से छोटा हैं… उसे वक्त हैं… असं माणिकराव ठाकरे अहमद पटेलांना म्हणाले. त्यावर ‘छोटा हैं तो क्या हुआ, बडा भी हमको ही करना हैं’… असं अहमदभाई माणिकरावांना म्हणाले. अहमदभाईंच्या फोननंतर दोनच दिवसांत पक्षाने माझ्या नावाचा व्हिप काढला. म्हणजे एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासाठी थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला फोन लावणं हे फक्त अहमदभाईच करु शकतात, अशा भावना व्यक्त करताना सत्यजीत तांबेंना गदगदून आलं होतं.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here