देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना दिला ‘शब्द’; ‘त्यांच्यावर’ कारवाई नक्कीच होणार

मुंबई :

ईडी ज्यांचे आदेश पाळत आहेत. त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणत्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि ईडीवर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, काही चुकीचं केलं नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. काही पुरावे असतील म्हणून ईडीनं कारवाई केली असेल. काही ठोस पुरावे हाती असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही. दरम्यान छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, महत्वाची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. जवळपास ४ तास चौकशी केल्यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेतले आहे. तर, ईडीने दुसरे पथक पुर्वेश सरनाईक यांच्या घरी दाखल झाले आहे.

दरम्यान राऊत यांनी ‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा’, असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई केली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये’, असे म्हणत भाजपला सुनावले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here