ईडी कारवाई चालू असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा आहे ‘एवढा’ मोठा पसारा; वाचा टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्सपासून काय काय आहे ग्रुपमध्ये

मुंबई :

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असून तपास सुरु आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरीसुद्धा ईडीने धाड टाकली आहे.

अशी आहे प्रताप सरनाईक यांची ओळख :-

प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदारकी भूषवतात.

विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचा परिचय :-

विहंग हे प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, तर पूर्वेश हे सरनाईक यांचे कनिष्ठ पुत्र. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सरनाईक भावंडांचे घनिष्ठ संबंध आहेत.

विहंग गृपविषयी :-

विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचे कनिष्ठ पुत्र पूर्वेश सरनाईक काम पाहतात. विहंग ग्रुप ऑफ कंपनी 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत.

विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत.

प्रताप सरनाईक यांचे ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेल आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. त्यात स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा सोयींचा समावेश आहे.

प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे वर्तकनगर येथे दहीहंडीचे आयोजन करते. संपूर्ण मुंबई-ठाण्यातून विविध दहीहंडी संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात.

संपादन : स्वप्नील पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here