शिवसेनेचा भाजपला सणसणीत टोला; एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला आणि तरीही…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज लव्ह जिहाद, भाजप, हिंदुत्व आणि प.बंगाल निवडणुकांविषयी भाष्य करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. फक्त ‘रोटी-बेटी’ व्यवहारापुरते व निवडणुकांपुरते ते नसावे. एका राज्यात गोमांस विक्रीला बंदी आणायची, गोमांस खाणे व बाळगणे हा कायद्याने गुन्हा ठरवायचा आणि त्याच वेळी गोवा किंवा ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांसाची खुली विक्री, व्यापार करायचे. ही अशी हिंदुत्व रक्षणाची प्रतारणा लव्ह जिहादच्या बाबतीत होऊ नये, हे महाराष्ट्र सरकारला ‘लव्ह जिहाद’बाबत प्रश्न विचारणाऱयांनी लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्षातील अनेक मंत्री व पुढाऱयांनी मुसलमान किंवा हिंदू मुलीशी लग्न केले आहे व त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत.

निर्भया, हाथरस प्रकरणी मुलींवर अत्याचार झाले. ते करणारे ‘लव्ह जिहाद’वाले नव्हते. या देशात एका समान नागरी कायद्याची गरज आहे व त्यात लग्नापासून मरणापर्यंत सगळय़ांना एकाच कायद्याच्या गाठीत बांधणे गरजेचे आहे. कुटुंब न्यायालयांत आज अनेक खटले ‘विभक्त’ होण्यासाठी तुंबले आहेत. यातील प्रकरणे ‘लव्ह’चीच जादा. ‘लव्ह जिहाद’चे विषय त्यात नाहीत. आता भाजपचे गृह राज्यमंत्री यांनी संसदेत सांगितले ते असे, ‘लव्ह जिहाद या संकल्पनेला कायद्यात कोणतेही स्थान नाही व आतापर्यंत कंद्रीय तपास यंत्रणांकडून एकही गुन्हा या प्रकरणी दाखल होऊ शकला नाही.’ हे कंद्राचे संसदेतले उत्तर याच वर्षातले आहे. त्यामुळे आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही.

बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे.

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here