महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया यांचं कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले आहे. धुपेलिया हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी होते. वयाच्या 66 वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत अखेरचा श्वास घेतला. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.

सतिश धुपेलिया यांना न्युमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची बहीण उमा धुपेलिया मेस्थरी यांनी दिली आहे. धुपेलिया यांच्या पश्चात दोन बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीचं नाव कीर्ती मेनन असं आहे. ती सध्या जोहान्सबर्ग येथे राहते आणि गांधी विचारधारेचा प्रसार करते.

महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी यांचे ते वंशज आहे. महात्मा गांधी यांनी आपले काम सुरू ठेवण्यासाठी मणिलाल यांना दक्षिण आफ्रिकेत ठेवले होते. मणिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेत राहून गांधीवादाचा प्रचार केला होता. सतीश धुपेलिया हे माध्यमकर्मी म्हणून कार्यरत होते. व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम करताना त्यांनी गांधीवादाचा प्रसार केला. गांधी विकास ट्रस्टच्या माध्यमातून ते काम करत होते. आफ्रिका खंडात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येन 20 लाखांचा टप्पा गाठला आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here