राज्याच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

पुणे :

राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. बुधवारी (२५ नोव्हें) चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. अरबी समुद्रात असलेले कमी तीव्र दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील काही भागांत हवामान कोरडे झाले आहे. दोन ते तीन दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली असल्याने काही भागात चांगलाच गारठा वाढला आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. शनिवारी (२१ नोव्हें) नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रीय स्थिती अजूनही कायम आहे. राज्यातील काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असले तरी नाशिक, नगर, जळगाव, महाबळेश्‍वर या भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. यामुळे या भागांत काहीसा गारवा असल्याने बोचरी थंडी असल्याची स्थिती आहे.

दरम्यान, विदर्भात काही अंशी कोरडे वातावरण असल्याने किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर गोंदिया, अमरावती, बुलडाणा या परिसरांत १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चढ-उतार असून, १५ ते २१ अंश सेल्सिअसच्या तापमान आहे. कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. यामुळे या भागात २१ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here