शिवसेना मंत्र्याची भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जाहीर ऑफर; तुम्ही राज्याचे नेतृत्व करा

अहमदनगर :

महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे राहाता तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. सत्तार हे विखे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. विखेंच्या पाठोपाठ सत्तार यांनीही कॉंग्रेस सोडली होती. दरम्यान आता शिवसेनेकडून मंत्री असलेल्या सत्तार यांनी ‘विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे’, असे म्हणत विखे यांना जाहीर आणि थेट ऑफर दिली आहे.

सत्तार म्हणाले की, आपली व विखे यांची जुनी मैत्री आहे. आपण एक कार्यकर्ता आहोत. माझे आणि विखे पाटलांचे वीस वर्षांपासूनचे परिवारिक संबंध आहे. सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राजकीय परिस्थिती कशीही असली तरी संपर्क आणि संबंध कधी वाया जात नाही. माझी अशी इच्छा राहील की विखे पाटील यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे. विखे यांना मी केवळ शिवसेनेत येण्याची ऑफर देत आहे.

यावेळी त्यांनी विखे यांना जुन्या गोष्टींचीही आठवण करून दिली. ते म्हणाले की, वडील स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि आणि स्वत: विखेही काही काळ शिवसेनेत होते. त्यांना शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे. यासाठी आपण पक्षप्रमुखांशी संपर्क करणार आहोत.

विखे यावर कशी प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान विखे यांनी यावर फार बोलकी प्रतिक्रिया न देता तटस्थ प्रतिक्रिया दिली. विखे म्हणाले की, श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. हा कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाचे राज्य मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना याठिकाणी बोलवले होते. सत्तार यांचा आणि माझा अनेक वर्षाचा स्नेह असून या कार्यक्रमाला येण्याची मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. त्यामुळे येथे दुसरा कोणत्याही चर्चेचा मुद्दा नाही.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here