मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज कोरोना, राजकारण आणि भाजप नेत्यांचे वागणे अशा विषयांवर भाष्य केले आहे. तसेच टीकाही केली आहे.
वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
राज्यातील अनेक शिक्षक व विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले आहेत. मंदिरांबाबत नियम पाळले नाही तर देवही परिस्थिती नियंत्रणात आणू शकणार नाही. त्यात विरोधी पक्ष ज्या बेजबाबदारपणे वागत आहे त्यामुळे स्मशानात लाकडांचा साठा जास्तच करावा लागेल व भाजपची तीच अघोरी इच्छा दिसत आहे. उैठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे? भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे. राजकारण्यांच्या काळजात मायेचा ओलावा नसेल तर ते हे असे बेजबाबदारपणे वागतात व त्यात निरपराध्यांचे बळी गेले तर त्याचा विजयोत्सव साजरा करतात. दुसऱयाच्या पराभवात एक वेळ आनंद मानता येईल, पण
कोरोना महामारी संकट
वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळय़ादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे. दिल्लीत आता ‘मास्क’ सक्तीचा. न घालणाऱयांना दोन हजारांचा दंड असा नियम लागू केला आहे. वारंवार हात धुण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. नव्या लॉकडाऊनमध्ये बाजार वगैरे बंद राहतील. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा त्यांनी काढलेला अर्थ असा की, दिवसा कोरोना विषाणू झोपतो व रात्री तो फिरत राहतो. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ”हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?” त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? ‘कोरोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय. कारण पंतप्रधान फक्त भाजपचे किंवा भाजपशासित प्रदेशांचे असा नवा पायंडा या मंडळींनी पाडला आहे.
तो लोकशाही, स्वातंत्र्य व हिंदुस्थानच्या संघराज्यास घातक आहे. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, कश्मीरातील रक्तपात, चीनची लडाखमधील घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय? पंतप्रधान मोदी हे जागतिक ‘जी-20’ संमेलनात त्यांनी कळवळून सांगितले, दुसऱया विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळय़ांत मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांनी समजून घ्यावे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे भाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड