शिवसेनेचा भाजपला सवाल : पण ‘त्यासाठी’ लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज कोरोना, राजकारण आणि भाजप नेत्यांचे वागणे अशा विषयांवर भाष्य केले आहे. तसेच टीकाही केली आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत.

आताही भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढते आहे याचे भान तरी त्यांनी ठेवावे. एका बाजूला बोंबलायचे, सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडत आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून टीका करायची. त्याच वेळी असे नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ येत आहे, पण भाजपला वाटत आहे ही लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरवू. आम्ही म्हणतो ठीक आहे. तुमचे राजकारण तुमच्यापाशी, पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here