लॉकडाऊन : गुजरातनंतर ‘त्या’ राज्यातही 5 शहरांमध्ये संचारबंदी

एकीकडे मंदिर आणि शाळा उघडण्याची तयारी केली जात असतानाच करोना विषाणूच्या रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने आता काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवत आहे. सगळे काही खुले करण्याच्या आणि सर्व धार्मिक सण दणक्यात साजरे करण्याच्या नादात आता पुन्हा एकदा संचारबंदीचा निर्णय घेऊन त्यावर पांघरून टाकण्याची वेळ येत आहे.

अगोदरच कडक लॉकडाऊन लागू करताना देशातील कोट्यावधी गरिबांना वणवण भटकावे लागले होते. त्यातून आता कुठे ही जनता उसंत घेत आहे तोवर सगळे काही उघडण्याचा खेळ प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना आघाडीवर आहेत. अशात आता गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात रात्रीची संचारबंदी लागू करावी लागली आहे. त्याच्या बातम्या येत असतानाच आता मध्यप्रदेश या एका मोठ्या राज्यातील 5 शहरात संचारबंदी लागू झालेली आहे.

 गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट व बडोद्यात शुक्रवारी रात्री ९ पासून सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. तसेच आता मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम व विदिशा या शहरात असा निर्णय जाळू झालेला आहे.

हरियाणामध्ये शाळा सुरु केल्यावर १५० पेक्षा जास्त विद्यार्थी संक्रमित आढळले. मग या शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्येही २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडणार होत्या. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. हिमाचलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. उत्तराखंडमध्ये शाळा उघडल्यानंतर फक्त ५ दिवसांतच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कर्नाटकात शाळा उघडल्या आहेत. तर, महाराष्ट्रात आता शाळा उघडल्या जाणार असून मुंबईत शाळा न उघडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here