शेतकरी हतबल : शेपू-कोथिंबीरीच्या जुड्या टाकाव्या लागल्या गुरांपुढे; वाचा, कुठे घडला प्रकार

पुणे :

कोरोनाचे संकट आणि त्यापाठोपाठ आलेल्या अस्मानी संकटातून शेतकरी आता कुठे सावरत असताना जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याला कवडीचाही भाव मिळत नाही. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यावर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात गुरुवारी (१९ नोव्हें) सायंकाळी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आणि शेपूची आवक झाली. कोथिंबीर आणि शेपूला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याच्या लाखों जोड्या बाजारातच सोडाव्या लागल्या आहे.

बाजारात योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी भाज्यांच्या जोड्या अखेर जनावरांना खायल्या घातल्या. कोथिंबीर आणि शेपूची भाजी शेतकऱ्यांनी गायी-म्हशींना खायला दिली. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते पण जड अंत:करणाने त्याने भाज्यांच्या जुड्या जनावरांपुढे ठेवल्या. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यावर शेतमालाला भाव नसल्याने ही परिस्थिती आल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून शेतकरी सावरत असताना लगेचच मुसळधार पावसाने राज्यभरात हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास आणि उभे पीक भुईसपाट झाले. अशा सर्व परिस्थितीशी दोन हात करत शेतकऱ्यानं पुन्हा पेरलेल्या भाजीलाही आता योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here