पुण्यात ‘अशा’ प्रकारे विकिसित होतेय हर्ड इम्युनिटी; जाणून घ्या कशी करते काम

पुणे :

जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. पुण्यातही रुग्णांची संख्या मोठ्या संख्येत होती. आता पुण्यातून एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. पुण्यात हर्ड इम्युनिटी विकसित होऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या सर्व्हेमधून अशी माहिती समोर आली आहे की, पुण्यातील नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे व्हायरसला प्रतिरोधक अशी क्षमता निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. पुण्यातील बहुतांश लोकांना कोरोना झाला असून काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली, तर काहींमध्ये लक्षणेच आढळली नाहीत. मोठ्या संख्येत लोकांना कोरोना झाला, तर देशात हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि अँटिबॉडीज तयार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे म्हटले जात आहे.

पुण्यातील ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी ८५ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी मिळाल्या आहेत. याचा अर्थ शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसशी लढण्याची क्षमता विकसित होत आहे. देशात विविध शहरांमध्ये सिरो सर्वे करण्यात आला, ज्यामध्ये दिल्ली आणि पुण्याचाही समावेश होता. पुण्यातील चार भागात हा सर्वे करण्यात आला. या सिरो सर्वेनुसार, जुलै आणि ऑगस्टमध्ये ५१ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती. अशा प्रकारचा हा पहिलाच सर्वे होता, ज्यामध्ये संक्रमित लोकांमध्ये अँटिबॉडी तयार होत असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने हर्ड इम्युनिटीला काल्पनिक गोष्ट असा उल्लेख केला होता. मात्र, स्वीडनने सर्वात आधी कोरोना व्हायरस विरोधात लढणारी हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे जाहीर केले होते.

हर्ड इम्युनिटी ही कोणत्याही साथीच्या आजारावेळी लोकांच्या शरीरात तयार होणारी रोग प्रतिकारशक्ती असते. एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अशी प्रतिकार शक्ती तयार झाल्यास आजाराचा संसर्ग थांबतो. आरोग्य मंत्रालयाने हर्ड इम्युनिटीबद्दल सांगताना म्हटलं की, देशात कोरोनाशी लढण्यासाठी सध्या तरी हर्ड इम्युनिटी हा पर्याय असू शकत नाही. मोठ्या संख्येनं संसर्ग किंवा लसीकरण झालं असेल तरच सामुहिक रोग प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. मात्र यामध्ये लोकांच्या जीवालाही धोका असतो. हर्ड इम्युनिटीच्या आधारावर देश वाचवण्याचा विचार करता येणार नाही.

हर्ट इम्युनिटी तयार होणं आणि ती तयार करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा एखाद्या भागातील मोठ्या संख्येनं लोकसंख्येमध्ये प्रादुर्भाव झाला असेल आणि त्यातून रुग्ण बरे झाले असतील तर त्या लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडीज तयार झाल्यानंतर व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यासाठी आवश्यक परिस्थिती मिळत नाही आणि संसर्गाचे प्रमाण कमी होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर शरीरात अँटिबॉडीज तयार करण्याचे काम लसही करू शकते.

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या इम्युनिटी असतात. एक असते इनेट इम्युनिटी आणि दुसरी असते अँडेप्टिव इम्युनिटी. या दोन्हींची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. इनेट इम्युनिटी ही अशी रोग प्रतिकारशक्ती असते, जी कोणताही व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात गेल्यानंतर अँक्टिव्ह होऊन तो संपवण्यासाठी काम करते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here