दक्षिण आफ्रिकेचा मालावी आंबा झाला ‘या’ बाजारात दाखल; खातोय चांगलाच भाव

पुणे :

तो मूळचा दक्षिण आफ्रिकेतील पण त्याचा रंग-साज अन्‌ चव अस्सल कोकणचीच. उन्हाळ्यात आपल्या चवीने तृत्प करणाऱ्या कोकणच्या हापूसची जागा आता त्याने घेतलीय. ऐन थंडीत त्याच चवीचा आस्वाद देणारा मालावी पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. आंबाशौकीनांकडून त्याला मागणीही चांगली आहे. कोकणच्या हापूस आंब्याप्रमाणे चव, रंग असलेल्या या आंब्याच्या तीन किलोच्या पेटीला दर्जानुसार 1800 ते 2000 भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात पेटीला 2000 ते 2200 भाव मिळत आहे.

मार्केट यार्डातील फळबाजारात प्रत्येक आठवड्यात साधारणतः चार हजार पेट्यांची आवक होत आहे. एका पेटीत साधारणपणे तीन किलो आंबे असतात. आकारमानानुसार एका पेटीत 12 ते 14 आंबे बसतात. घाऊक बाजारात मागील आठवड्यात मालावी हापूसच्या पेटीला 2200 ते 2400 रुपये दर मिळाला होता. गेल्या दोन दिवसांत मालावी हापूसच्या पेटीमागे 200 रुपयांनी घट झाली. किरकोळ बाजारात याची विक्री 2200 ते 2400 रुपये दराने केली जात असल्याची माहिती आंबा व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेतील मालावी देशात एका युरोपियन कंपनीकडून हापूस आंब्यांची लागवड केली जाते. कोकणाप्रमाणेच मालावीतील वातावरण या आंब्यांच्या लागवडीला पोषक आहे. तेथे अडीच हजार हेक्‍टर क्षेत्रावर आंबे, केळी, अननसाची लागवड केली जाते. युरोपियन कंपनीने मालावीत आंबा लागवड केल्यानंतर सुरुवातीला हापूसची आवक तुरळक प्रमाणात होत होती. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मालावी हापूसची आवक वाढली आहे. गेली पाच वर्षे मालावी हापूसची आयात केली जात आहे. गेल्या वर्षी नव्वद टन मालावी हापूसची आयात करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात पंधराशे पेटी हापूसची आवक झाली असल्याची माहिती व्यापारी सलिम बागवान यांनी दिली.

मार्केट यार्डचे आंबा व्यापारी नाथसाहेब खैरे म्हणालेत की, मालावी हापूस आंब्याचा हंगाम हा 15 ऑक्‍टोबर ते डिसेंबरपर्यंत सुरू असतो; परंतु सततच्या पावसामुळे यंदा आयातीला उशिर झाला. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या आंब्याचा रंग आणि चव तशीच आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त विक्री होत असते. एका शेतकऱ्याने 2013 ला दापोली येथून हापूस आंब्याचे कलम आफ्रिकेत मालवी येथे नेले होते. त्या ठिकाणी 2500 हेक्‍टरवर त्याची लागवड केली. त्यानंतर चार ते पाच वर्षांपासून त्याचे उत्पन्न सुरू झाले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here