म्हणून मुंबईतील शाळा ‘त्या’ तारखेपर्यंत बंदच राहणार; आयुक्तांचा निर्णय

मुंबई :

हरियाणामध्ये शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. तसेच दिल्लीतही कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. अशातच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. एकूणच परिस्थिती आणि मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेषतः मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर मुंबईत शाळा सुरु केल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शाळांची स्वछता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. यानुसार सर्व शाळेत सॅनिटायझेशनसाठी सॅनिटाईजर पुरवणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि इतर साहित्य महापालिकेतर्फे पुरवण्यात येणार आहे. मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here