तर जळून खाक व्हाल; शिवसेनेचा ‘त्यांना’ थेट इशारा

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज मुंबईवर शुद्ध भगवा, भाजप या अनुषंगाने भाष्य करत टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मुंबई महापालिकेवरील भगव्याची चिंता ज्यांना वाटत आहे ते सगळे बेगडी नरवीर बेळगावच्या महानगरपालिकेवरील भगवा भाजपच्याच नतद्रष्टांनी उतरविला तेव्हा कोणत्या बिळात लपले होते? बेळगाव महापालिकेवरील भगवा शुद्ध, स्वाभिमानी नव्हता काय? बेळगावात मराठी माणसांना रस्त्यावर तुडवले जाते, त्यांच्या खांद्यावरील भगवा कानडी सरकार पायाखाली चिरडून मुरडून टाकते तेव्हा त्या आक्रोश करणाऱ्या भगव्यासाठी यांचे मन का गर्जना करीत नाही? बेळगावच्या मराठी माणसाच्या हाती जो भगवा आहे तोच भगवा मुंबई महापालिकेवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून फडकतोय. हा भगवा कोणाला उतरवायचा आहे काय?

मुंबई महापालिका ही मराठी अभिमान, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले. बाळा नातू व चिंतू पटवर्धन या पेशव्यांनी लाल महालावरील भगवा खाली खेचून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. भगवा खाली उतरविताना त्या मंडळींच्या चेहऱयावर एक प्रकारचा आसुरी आनंद दिसत होता.

भगवा उतरताना पाहून समस्त पुणेकर, देश दुःखाने खाली मान घालून चरफडत होते, पण काही मंडळी अत्यानंदाने बेहोश झाली. त्या बेहोश मंडळींच्या वारसदारांना मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत झाले. त्यातूनच सह्याद्रीचा जन्म झाला. त्याच खळबळीत मुंबईचा जन्म झाला. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा ‘युनियन जॅक’ फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here