शिवसेनेचा भाजपला खडा सवाल; ‘तेव्हा’ कोणत्या बिळात लपले होते?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज मुंबईवर शुद्ध भगवा, भाजप या अनुषंगाने भाष्य करत टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही 105 मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे. छत्रपती शिवरायांचा त्याग, त्यांचे हजारो, लाखो मावळे, महाराष्ट्र घडवताना कामी आलेल्या मर्द मराठय़ांच्या रक्ताचे शिंपण या भगव्यावर झाले आहे. दिल्लीच्या अजगरी जबडय़ातून मुंबईची सुटका करण्यासाठी मराठी माणसे गोळय़ा, लाठय़ांची पर्वा न करता रस्त्यावर उतरली.

त्यांच्या रक्ताच्या तेजाने हाच भगवा सूर्यतेजाला आव्हान देत असतो. हा मराठी अस्मितेचा, हिंदू तेजाचा अस्सल भगवा उतरविण्याचे कपट-कारस्थान जे करीत आहेत ते देशातील प्रखर हिंदुत्वाचा अपमान करीत आहेत. त्यांना मुंबई महापालिकेवरील भगवा राजकीय स्वार्थासाठी उतरवायचा आहे. धन्य धन्य त्या दळभद्री विचारांची! महाराष्ट्राच्या मातीतून हे असे कोळसे निपजावेत व भगव्यास कलंक लागावा यासारखे दुर्दैव ते कोणते! भगवा हा जगभरात एकच आहे, तो म्हणजे शिवरायांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचाच! मुंबई महापालिकेवरील भगव्याची चिंता ज्यांना वाटत आहे ते सगळे बेगडी नरवीर बेळगावच्या महानगरपालिकेवरील भगवा भाजपच्याच नतद्रष्टांनी उतरविला तेव्हा कोणत्या बिळात लपले होते? बेळगाव महापालिकेवरील भगवा शुद्ध, स्वाभिमानी नव्हता काय? 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here