बिहार निवडणुकांवरून शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली; वाचा, काय म्हटले आहे सामनात

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज मुंबईवर शुद्ध भगवा, भाजप या अनुषंगाने भाष्य करत टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, पण त्या जिंकताना त्यांचा कसा दम निघाला ते देशाने पाहिले. बिहार निवडणुकीचे प्रभारी आपले देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे विजयाचे श्रेय मोदींइतकेच फडणवीस यांच्याकडेही जाते. प्रश्न इतकाच आहे की, बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे?

विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न.

शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे. हा भगवा उतरवून वेगळा झेंडा फडकवणे ही महाराष्ट्राशी आणि छत्रपती शिवरायांशी प्रतारणा आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here