अडीच महिन्यांपूर्वी रडलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता परतले समाधान; वाचा, स्पेशल रिपोर्ट थेट बांधावरून

पुणे :

वीस वर्षात प्रथमच बटाट्याला शेताच्या बंधावर ३७१ रुपये प्रतिदहा किलो असा उच्चांकी दर मिळत असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अडीच महिन्यापूर्वी सातगाव पठार भागातील बटाटा पावसाने सडला शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये नुकसान झाले होते. त्यावेळी पावसाने रडवले परंतु आता उच्चांकी बाजारभावाने शेतकऱ्यांना हसवले आहे.

आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामात 5 हजार हेक्टरहुन अधिक बटाट्याचे क्षेञ आहे.तालुक्याच्या पुर्व भागातील नागापुर,रांजणी,थोरांदळे खडकी,जाधववाडी या भागातील शेतकरी हंगामपुर्व बटाटयाची लागवड करतात परंतु यंदाच्या वर्षी बटाटा बियाणे ४५०० हजार रुपयाच्यावर गेल्याने अनेकांनी यंदा बटाटा लागवडीकडे पाठ फिरवली तरी देखील एक ते दीड हजार एकर बटाटा पिक शेतक-यांनी घेतले आहे त्यामध्ये अडीच महिन्यापुर्वी पावसामुळे बटाटा बियाणे सडल्याने शेतक-यांचे नुकसान झाले,अनेकांना पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली त्यामुळे मोठा आथिक फटका बसला अशामध्ये बियाणे पाच हजाराच्या वर गेल्याने पुन्हा लागवड करणे शक्य झाले नाही.

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील रब्बी हंगामातील बटाटा काढणीला प्रारंभ झाला असुन समाधानकारक गळीताबरोबर बटाटयाला उच्चांकी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गेल्या वीस वर्षात प्रथमच बटाटयाला उच्चांकी असा प्रति दहाकिलो ३७१ रुपये बाजारभाव मिळाला आहे.शेतकऱ्यांनी ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल रुपये दराने बटाटा बियाणे खरेदी केले.

मजुरी,खते,औषधे,बियाणे असा एकरी एकुण ७० हजार रुपयांहुन अधिक खर्च आला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बटाटयाचे चांगले उत्पादन मिळत आहे.सध्या बटाटा काढणी सुरु असुन पिशवीमागे 10 ते १५ पिशवींचे गळीत पडत आहे या हंगामातील सर्वाधिक भाव दौलत भोर यांच्या बटाट्याला मिळाला आहे.प्रतिदहाकिलो ३७१ रुपये बाजारभावाने शेताच्या बांधावर व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी त्यांचे बटाटे खरेदी गुरुवार(ता.१९)रोजी खरेदी केले.

नागापुर (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी दौलत भोर यांनी आपल्या 45 गुंठे क्षेत्रावर बारा कट्टे लागवड केली होती. बियाणे, खते औषधे, मजुरी, बटाटा लागवड व काढणी ट्रॅक्टरच्या साहय्याने करण्यात आली असून, एकूण ७० ते ७५ हजार रुपये खर्च आलेला आहे. बटाटा काढणी पूर्ण झाली असून, त्यातून साडेनऊ टन उत्पादन मिळाले आहे. प्रति दहा किलोसाठी ३७१ रुपये दर मिळाला आहे. खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. यंदा मिळालेला दर गेल्या वीस वर्षात प्रथमच उच्चांकी मिळालेला आहे. तसेच त्यांना ५० किलो पिशवीमागे १४ ते १५ पिशव्यांचे गळीत पडले आहे.

शेतकरी शंकर टेमगिरे म्हणाले की, यंदाच्या बटाटा पिकाला चांगला बाजारभाव मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे. बटाटा काढणी सुरुवात झाली एकुण लागवड केलेल्या ७ एकर बटाटा पिकापैकी सव्वा एकरातील बटाटा काढणी झाली आहे. यात १५० पिशव्या उत्पादन मिळाले असून, ३७१ रुपये दर मिळाला आहे. अजून पुढील बटाटा काढणीतूनही चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here