सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; वाचा, अजून किती कमी होणार दर

मुंबई :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. सलग चौथ्या दिवशी या सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून आता प्रती तोळा 50,180 रुपये दर आहेत.

चांदीच्या दरातही घसरन झाली असून या घसरणीनंतर भाव 62,043 रुपये प्रति किलो झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यामध्ये आतापर्यंत साधारण 6000 रुपयांची घसरण झाली आहे. कोरोना या साथीच्या रोगामुळे सोन्याच्या मागणीत मोठी कपात झाली असून त्यामुळे सोन्याच्या आयातीमध्येही मोठी घट झाली आहे. 

जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोरोनालसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात आता सातत्याने घट होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव 50,000 रुपये प्रति तोळाहूनही खाली येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या 49,550 ची सपोर्ट लेव्हल पाहायला मिळू शकते. चांदीचे दर 62,000 रुपये प्रति किलो पेक्षा कमी होऊ शकतात. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here