रजिस्ट्रेशन नसलेल्या विरोधी आमदाराच्या कारखान्याच्या ऑफिसचे चव्हाण साहेबांनी केले होते उदघाटन; वाचा जबरदस्त किस्सा

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेल्या शंकरराव मोहिते पाटील यांनी 1956-57 मध्ये अकलूज बावडा परिसरात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना उभारण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला साखर कारखान्यासाठी तीन लाख रुपये एवढे भाग भांडवल शेअर्स मधून उभे करणे गरजेचे होते. मोठ्या कष्टाने भांडवल उभे करून शंकरराव व त्यांचे सहकारी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा त्यांना कळाले की केंद्र सरकारने ही मर्यादा पाच लाख रुपये एवढी केली. निराश झालेले परंतु उमेद व जिद्द कायम असलेले शंकरराव व माणिकलाल शेठ, घारमाळकर व इतर सहकारी परत एकदा भाग भांडवल जमा करण्याच्या कार्याला जुंपले.

पाच लाख भाग भांडवल जमा झाल्यानंतर परत एकदा दिल्लीला गेल्यावर हे कळाले की केंद्राने आता सहकारी कारखान्यांना मंजुरी देण्याचे धोरण बंद केले आहे. हे सर्व भाग भांडवल बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले.भाग भांडवल जमा परंतु कारखान्याला परवानगी नाही अशा परिस्थितीत भागधारकांच्या मनामध्ये काही लोक मुद्दाम शंका निर्माण करू लागले. अशातच राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब अकलूज परिसरातील माळीनगर कारखान्याच्या दौऱ्यावर येणार आहेत असे कळाले. त्यावेळी शंकररावजी मोहिते यांनी शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी यशवंतरावजी चव्हाण साहेबांना निमंत्रण दिले होती व ते त्यांनी स्वीकारले. तारीख ठरली 19 नोव्हेंबर 1959. . माळीनगर कारखान्याला भेट दिल्यानंतर दुपारी शंकररावांच्या वस्तीवर जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

शाळेच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना प्रस्तावित साखर कारखान्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी गेल्यावर चव्हाण साहेब साशंकतेने म्हणाले, “शंकरराव, अजून कारखान्याचे रजिस्ट्रेशन नाही ना!”तेव्हा शंकरराव म्हणाले,” नाही नाही. नियोजित कारखान्याचं हे फक्त ऑफिस. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हीच आम्हाला मदत करणार साहेब. मगच काम होईल.”यशवंतराव गालातल्या गालात हसले. आणि त्यानंतर 251 खिल्लारी बैलांच्या रथातून चव्हाण साहेबांची सभास्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पन्नास ते साठ हजार लोकांच्या जाहीर सभेत यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले,” शंकररावांची धडपड आणि तुमच्या सर्वांचा त्यांना असलेला हा पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे. तुमची मुख्य मागणी माझ्या लक्षात आली आहे. आणि आज मी तुम्हाला या भरसभेत आश्वासन नाही तर वचन देतो की लवकरच आमची पॉलिसी बदलणार आहे. आणि सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली जाईल. त्यावेळी परवानगी दिलेल्या पहिला कारखाना हा अकलूजचा कारखाना असेल.

———————————————————————

जनसेवेची तळमळ असलेल्या एका विरोधी पक्षाच्या आमदाराच्या रजिस्ट्रेशन नसलेल्या कारखान्याच्या कार्यालयाचे उद्घाटन करणे आणि आपल्या भाषणातून परिसरातील जनतेला व भागधारकांना कारखान्याच्या भवितव्याबद्दल आश्‍वस्त करणे, हा मनाचा मोठेपणा फक्त यशवंतराव चव्हाण साहेब दाखवू शकतात. नंतरच्या काळात शंकरराव मोहिते पाटील यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला. परंतु बेरजेचे राजकारणाची यशवंतनीती अशा प्रकारच्या लोकहितकारी विकास कार्यावर, मनाच्या मोठेपणावर, दिलदारीवर आधारलेलं होती.

संकलन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here