वाहनचालकांनो सावधान : ‘त्यामुळे’ आता वाहनांवर होणार कारवाई, नाही कुठलीच सूट

पुणे :

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून काळ्या काचांच्या वाहनांनी हैदास घातला असताना आता शिक्रापूर पोलिसांनी काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु केली. काळ्या काचांच्या वाहनांवर आवर बसणार असून दादागिरी कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे.

शिक्रापूरसह परिसरात सर्वत्र अनेक दिवसांपासून गडद काळ्या रंगांच्या काचांच्या वाहनांचा वावर वाढला आहे. नुकतेच पेरणे फाटा येथे काळ्या काचांच्या वाहनातून खुनाचा प्रकार घडला असताना शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये फिरणाऱ्या सर्व काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाईचे आदेश पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिले आहेत. पोलिस हवालदार सहदेव ठुबे, पोलिस शिपाई मिलिंद देवरे, होमगार्ड लक्ष्मण शिवले, निखील सुळके, गणेश शिंगाडे, भानुदास रूपनेर यांनी शिक्रापूर चौकामध्ये कारवाई मोहीम हाती घेतली असून, बेशिस्त वाहन चालकांसह काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई मोहीम सुरु केली आहे.

सदर वाहनांच्या काळ्या काचांची फिल्मिंग काढून टाकत वाहन चालकावर दंड आकारला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईचा परिसरातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असून, पुढील काळामध्ये काळ्या काचा नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात देखील मोठी मदत होणार आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई मोहीम सुरु करण्यात आलेली असताना, या कारवाई मधून कोणीही नेता, पुढारी, कार्यकर्ते असले तरी देखील कारवाई केलीच जाणार आहे. कोणाचीही हयगय केली जाणार नसल्याचे यावेळी कारवाई करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here