दुर्दैवी घटना : एकाला वाचवताना आणखी दोघा भावांचाही मृत्यू; एकाचवेळी तिघेजण गेल्याने गावावर शोककळा

शेती करणे हे येरागबाळाचे काम नाही. कारण, त्यात भाव मिळण्याची शाश्वती तर नाहीच पण अस्मानी आणि सुलतानी संकटांची यादी मोठी आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यूझाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. एका भावाला विजेचा करंट लागल्यावर त्याला वाचवायला गेलेल्या आणखी दोन्ही भावांचाही दुर्दैवी मृत्यू त्या घटनेत झाला आहे.

पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26), रामेश्वर आप्पासाहेब जाधव ( वय 26) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय 18) हे तिघे भाऊ या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. बुधवारी रात्रीचे जेवण करून 8 वाजेच्या दरम्यान शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी तीघेही गेले होते. त्यावेळी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला करंट लागून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मध्यरात्री ते मागे येत नसल्याने आणि फोन लागत नसल्याने 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस दाखल झाले. दरम्यान जोपर्यंत महावितरणवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृत्यदेह उचलू देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here