नोकरी गेल्यावर बांधले पोल्ट्रीशेड; कमावला दोन महिन्यात 2.54 लाखांचा नफा

करोना विषाणूच्या साथीत अवघ्या जगामध्ये मोठे बदल झालेले आहेत. अनेकांचे रोजगार गेले, तर काहींनी नवीन संधी साधल्या. अशाच पद्धतीची किमया केली आहे माढा (जि. सोलापूर) येथील भुषण आणि स्वप्ना सिरसट या दांपत्याने. होय, नोकरी गेल्यावर खचून न जाता त्यांनी पोल्ट्री सेक्टरमध्ये नवीन संधी शोधली आहे.

कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यावर पुण्यातील येरवडा भागात असलेल्या कंपनीत सिव्हील इंजिनिअर म्हणुन कार्यरत असलेल्या सिरसट दांपत्यास गावाकडे यावे लागले. त्यांनी मग पाच महिन्यापूर्वी आता गावातच व्यवसाय करण्याचे नियोजन केले. कोणता व्यवसाय करायचा याचा खूप विचार करून त्यांनी गावरान (देसी) कोंबड्या संगोपन करण्याचे ठरवले. केवड या गावातील जमिनीत त्यांनी शेड बांधून 200 कोंबड्या टाकल्या. अशा पद्धतीने व्यवसायाला छोटेखानी सुरुवात झाली.

नंतर आत्मविश्वास वाढल्यावर त्यांनी वडिलोपार्जित एक एकर शेतीत 32×60 चे पत्राचे शेड उभारून 3 हजार देशी कोंबड्या आणल्या आणि त्यांचे संगोपन सुरू केले. त्यांचा त्यासाठी 60 दिवसांत एकुण 4 लाख 64 हजार इतका खर्च झाला. मात्र, एकूण विक्रीतून 2 लाख 54 हजारांचा नफा मिळाला.

यशानंतर आताच्या घडीला त्यांनी दहा हजार देशी कोंबड्याचे पालन सुरू केले असुन त्यासाठी 30×150 आकाराचे शेड उभारले आहे. भूषण याबाबत सांगतात की, कोरोना लॉकडाऊनमुळे मात्र आम्हाला जीवनाचा नवा मार्ग मिळाला. नोकरीच्या मागे न धावता आजच्या तरुणाईने शेती पुरी व्यवसाय करणे गरजेचे आहे. 1 लाख देशी कोंबड्याचे पालन करण्याचे माझे नियोजन सुरू आहे. 

तर, स्वप्ना यांनी म्हटले आहे की, गावापासून दूर राहुन ठरावीक पैसे मिळण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायातून समृध्दी कशी मिळते, ते आम्हाला समजले. दुसरीकडे चाकर म्हणुन राहण्यापेक्षा स्वतःहा मालक होण्याचे स्वप्न बाळगायला हवे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here