शुगर फॅक्टरीत 15 कोटींचा अपहार; भाजप आमदार बंब यांच्यासह 16 जणांवर एफआयआर..!

राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्याकडे काळेबेर न सापडणे म्हणजे अपवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाने दुंगा’वाल्या भाजपच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या हिताला बाजूला सारून शुगर फॅक्टरीत 15 कोटींचा अपहार केल्याची घटना पुढे आली आहे.

होय, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखान्यातील निधीची फेरफार केल्याच्या आरोपाप्रकरणी आमदार प्रशांत बंब आणि इतर 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचे हे प्रकरण आहे.

2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. मात्र विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितले आहे. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर आता प्रशांत बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभासदांनी म्हटले आहे, असे दैनिक दिव्य मराठी यांच्या बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here