गौ-कॅबिनेटवरून काँग्रेस-भाजप यांच्यात लढाई; पहा नेमके काय म्हटलेय कमलनाथांनी

मध्यप्रदेश राज्यातील सर्व निवडणुका मुलभूत विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी थेट धार्मिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. इथे भाजप आणि काँग्रेस असे दोघेही एकच भाषा बोलत असतात. आताही शेती, बेरोजगारी, गरिबी, आरोग्याचे प्रश्न हे सर्व मुद्दे निकाली काढीत भाजप आणि काँग्रेस गौ-कॅबिनेट या मुद्द्यावर भिडले आहेत.

मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, राजस्व, गृह आणि शेतकरी कल्याण विभाग एकत्रित करून गौ-कॅबिनेट तयार केली आहे. 22 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता गौ-अभ्यारण सालरिया आगर-मालवा याची पहिली बैठक आहे.

यावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निशाणा साधला आहे. 2018 मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी प्रदेशात गौ-मंत्रालय बनवण्याची घोषणा करणारे शिवराज सिंह आता गौ-कॅबिनेट बनवण्याविषयी बोलत आहेत. संपूर्ण प्रदेशात गौ-अभ्यारण आणि गौशाला बनवण्याविषयी चौहान यांनी सांगितले होते. 15 वर्षात आणि सध्याच्या 8 महिन्यांत भाजप सरकारने गौमाताच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काहीही केले नाही. दुसरीकडे, कॉंग्रेस सरकारने चाऱ्याच्या रकमेत प्रति गाय 20 रुपयांची तरतूद केली होती. ती देखील कमी करण्यात आली.

एकूणच आता या राज्यात गाय हा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू बनला आहे. इतर राज्यांमध्येही याचे लोण जाऊन अवघा देश याच मुद्द्यावर आता चर्चा करीत बसण्याची शक्यता आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here