सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; वाचा, काय आहे कारण

दिल्ली :

बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 357 रुपयांनी घसरून प्रती तोळा 50,253 रुपयांवर आला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. यापूर्वीच्या व्यापारात सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीदेखील 532 रुपयांनी घसरण होऊन 62,693 रुपये प्रति किलो झाली. मंगळवारीच्या बाजारात किंमत प्रतिकिलो 63,171 रुपयांवर बंद झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, जागतिक स्तरावर मजबूत किंमती असूनही केंद्रीय बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाच्या मूल्यात तीव्र सुधारणा झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीत 357 रुपयांनी घसरली आहे. दिवसाच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत सुमारे 32 पैशांनी मजबूत झाला आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोरोनालसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात आता सातत्याने घट होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत1,882 डॉलर इतकी झाली, तर चांदीही प्रति औंस 24.57 डॉलरवर गेली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here