‘त्यावरून’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला ठाकरे सरकारला इशारा; जशास तसं उत्तर देऊ

मुंबई :

वीजबिलमाफीची अपेक्षा ठेवणाऱ्या सवर्सामान्य माणसांना ठाकरे सरकारने झटका दिला. ‘लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावचं लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही’, असे ठाकरे सरकारने स्पष्ट सांगितले. त्यावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू’, असा इशारा दिला आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले होते की, लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावचं लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत दिली जाणार नाही. वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही. बिले भरली पाहिजेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राऊत यांना सवाल करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ.

दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, वाढीव वीज बिलाबाबत दिलासा दिला जाईल, असे वारंवार सांगणारे ऊर्जा मंत्री राऊत यांनी त्या बाबत यू-टर्न घेऊन ग्राहकांची फसवणूक केली आहे. राऊत यांच्याविरुद्ध विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल, खोटारड्या सरकारला हजार व्हॉल्टचा शॉक देणे आवश्यक आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here