म्हणून शेतकऱ्यांना रोखऐवजी दिले चेकद्वारे पैसे; व्यापाऱ्यांनी सांगितले ‘हे’ कारण

लासलगाव :

३ महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री चालू होती नंतर त्यात दुपटीने वाढ होऊन नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये तर जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळू लागला होता. नंतर केंद्राने किमतीला लगाम लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आणि व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक करण्यास मर्यादा घालून दिली आहे. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रोख पैसे न देता व्यापाऱ्यांकडून धनादेश दिले जात आहेत.

कांद्यासह भुसार शेतमालासाठीसुद्धा चेक दिले जात आहेत. ऐन दिवाळीच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. आधीच बँकांना सुट्ट्या, त्यातच शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून रोखऐवजी दिले जाणारे हे चेक बघता शेतकरी नैसर्गिक संकटापेक्षा या व्यवस्थेमुळे जास्त भरडला जात आहे, हे दिसून येते. काही अशिक्षित किंवा बँकेचे व्यवहार न कळणाऱ्या शेतकर्यांचे तर जास्तच हाल होताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांना या चेकविषयी विचारले असता त्यांनी आयकर विभागाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणी केंद्राच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या आयकर विभागाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. आयकर विभागाची ही भूमिका शेतकरीविरोधी आहे. येथे पूर्वापार शेतकऱ्यांना रोख पैसे देण्याची पद्धत आहे. पिंपळगाव, चांदवड बाजार समितीत रोख पैसे मिळत असताना लासलगावला का नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here