शिवसेनेचा हल्लाबोल; ते आमदार भाजपातच सामील करायचे आणि…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज बिहार निवडणूकींचे लागलेले निकाल आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. 

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

नितीशकुमार या मेहेरबानीच्या ओझ्याखाली किती काळ तग धरतील? की एक दिवस स्वतःच हे ओझे फेकून देतील व नवा रस्ता स्वीकारतील? समोर तेजस्वी यादवांचे आव्हान उभेच ठाकले आहे व विधानसभेत 110 आमदारांची भिंत पार करणे सोपे नाही. तेजस्वी यादव हे तरुण, मिश्कील व बोचरी टीका करणारे नेते आहेत. नामधारी मुख्यमंत्री झाल्याबद्दल तेजस्वी यांनी नितीशकुमारांना शुभेच्छा दिल्या आहेत. खुर्चीच्या महत्त्वाकांक्षेऐवजी बिहारच्या जनतेच्या आकांक्षा आणि 19 लाख नोकऱया, रोजगार, शिक्षण, औषध, उत्पन्न आणि सिंचन यावर दिलेली आश्वासने पूर्ण करा असे तेजस्वी नव्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले.

तिकडे चिराग पासवान यांनीही नितीशकुमारांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची शंका रास्त आहे. बहुमत आहे, पण ते भक्कम नाही. भाजप काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे. हे आमदार ‘जदयु’पेक्षा भाजपातच सामील करायचे व आकडा वाढवून नितीशकुमारांना दबावात आणायचे असे घडू शकेल. काँग्रेसची कामगिरी सुमार झाली त्याचे खापर फक्त राहुल गांधींवर फोडणे योग्य नाही. नितीशकुमार यांची कामगिरी तरी कुठे चमकदार झाली? ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव मात्र विरोधी पक्षात बसले.

महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here