भाजपच्या ‘त्या’ त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल; शिवसेनेचे शालजोडीतून फटकारे

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज बिहार निवडणूकींचे लागलेले निकाल आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. 

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री तर केले नाहीच, पण जास्त आकडय़ाच्या जोरावर भाजपने एक सोडून दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. त्यामुळे नितीशकुमारांची डोकेदुखी वाढणार आहे.

महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळय़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल.

नितीशकुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, आपल्याला यावेळी मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपच्या आग्रहाखातर आपण ते पद स्वीकारत आहोत. भाजपच्या कर्तबगारीची ही कमालच म्हणावी लागेल किंवा फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मोदी साहेबांचे बिहारवर विशेष प्रेम आहे. ते आता स्पष्टच दिसते. महाराष्ट्रात भाजपच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही, पण बिहारात तिसऱया क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाचा मुकुट बहाल केला. काय हे औदार्य! राजकारणातल्या या त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here