‘ते’ म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे; शिवसेनेचा भाजपला सणसणीत टोला

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज बिहार निवडणूकींचे लागलेले निकाल आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. 

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, पण यावेळी शपथग्रहण सोहळय़ात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता. संपूर्ण सोहळय़ावर भारतीय जनता पक्षाचीच छाप होती. बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते ‘भाजप’वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा ‘राजद’ पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे, पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱयावरचे तेज उडाले आहे.

नितीशकुमार सलग सात वेळा मुख्यमंत्री झाले ते अशाच तडजोडी करून. भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ”नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.” महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात.

गंमत अशी की, बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here