म्हणून मागणी असूनही हळदीला मिळतोय कमी दर; वाचा, काय आहे कारण

सांगली :

कोरोनाचा आणि पावसाचा फटका विविध पिकांना आणि परिणामी उद्योगांना बसला असला तरीही काही पिकांना अद्यापही मागणी आहे. देशभरातून मागणी असलेल्या सांगलीच्या हळदीला कमी दर मिळत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये हळदीला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात हळद पावडरीच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच यावर्षी अंदाजे पाच टक्क्यांनी निर्यातवाढ झालेली आहे. असे असतानाही हळदी पावडरच्या दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे.  

सांगलीच्या हळदीला देशभरातून मागणी आहे. तब्बल १०० वर्षांपेक्षा मोठा इतिहास या सांगली हळद बाजारपेठेला आहे. दरवर्षी मागणी वाढतच आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत हळदीच्या दरात वाढच होताना दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी त्याचा फटका हळद पावडर उद्योगाला बसला आहे. यावर्षी कोरोनामुळे हळदीची मागणी वाढली, अगदी परदेशातूनही मोठी मागणी आलेली असली तरी दर मात्र ‘जैसे थे’ असल्याची माहिती बाजारपेठेतील जाणकार मंडळींनी दिली.

यावर्षी हळद पावडरच्या किलोमागे १० ते १५ रुपयांची घसरण झाली असून भविष्यात हे दर अजूनच कमी होऊ शकतात, असाही अंदाज जाणकारांनी सांगितला आहे. बाजार समितीत आलेल्या हळदीच्या ५०% हळदीची पावडर केली जाते. सांगलीत हळद पावडर करणारे ६० हून अधिक कारखाने आहेत. एकूणच काय तर मागणी असूनही दर कमी मिळत आहेत, असे चित्र हळदीच्या गाजलेल्या बाजारपेठेत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here