‘या’ भाजप नेत्याची बाळासाहेब ठाकरेंना खोचक श्रद्धांजली; जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही

मुंबई :

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. दिवसभरात सोशल मिडियासह शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केले जात आहे. आज महाविकास आघाडीसह अनेक भाजपच्या नेत्यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दरम्यान माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनीही श्रद्धांजली वाहिली मात्र त्यावेळी त्यांनी खोचक शब्द वापरले.

निलेश राणे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वैर उभ्या महाराष्टाला सर्वश्रुत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून तर विविध मुद्द्यावरून राणे कुटुंबीय ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेवर टीका करत असतात. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतरही राणे कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात राणेंच्या आरोपांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यामुळं राणे कुटुंब आणि ठाकरे यांच्यातील हे शाब्दिक युद्ध बराचकाळ टिकलं होतं. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here