म्हणून उद्योगी कल्पनांना उभारी द्या; वाचा अंबानींनी अधिग्रहण केलेल्या ‘अर्बन लॅडर’चा इतिहास

मराठी माणूस व्यवसायात पडण्याच्या ऐवजी नोकरीसाठी पैसे देणे सोपे समजतो. कारण, किमान मासिक वेतन मिळण्याची त्यात हमी असते. मात्र, कमाल वेतनाची आस असणाऱ्यांनी आपल्या कल्पनांना उभारी द्यायला पाहिजे. त्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायंसने नुकतेच अधिग्रहण केलेल्या ‘अर्बन लॅडर’चा (UrbanLadder) इतिहास नक्कीच वाचा.

आता ही कंपनी अनेकांना माहिती आहे. कारण, अशीही एक कंपनी असल्याचे आपण यापूर्वी अनेकदा गुगल सर्चला पहिले असेल किंवा आता अंबानींच्या गुंतवणूक करण्याने ही कंपनी तर नक्कीच ऐकली असेल. वाचक मित्र-मैत्रिणींनो, ही कंपनी काही खूप जुनी नाही. 2012 मधील हे स्टार्टअप आहे. त्यावेळी तर ऑनलाईन खरेदी म्हणजे दिवास्वप्न वाटत होते. अशावेळी आशिष गोयल यांनी ही कंपनी स्थापन केली.

गोयल यांनी तत्पूर्वी मेकेंसी अँड कंपनी, अमर चित्र कथा, कॉग्नीझंट, याहू अशा संस्थांमध्ये काम केले होते. सुरुवातील ही नवीन संकल्पना तत्कालीन कोणालाही आवडली नाही. लोकही अशा पद्धतीने फर्निचर किंवा घरातील मोठ्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खूप पुढे येत नव्हते. त्या कालावधीत गोयल यांनी आपली कल्पना लावून धरली. 2017 मध्ये ऑनलाइनसह ऑफलाईन स्टोअर सुरू करण्याचा कंपनीने निर्णय घेतला.

आता कंपनीचे 4 ऑफलाईन स्टोअर आहेत. अगोदरची खूप वर्षे तोट्यात गेल्यावर मग ग्राहक वाढत गेल्याने 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीला तब्बल 49 कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र, तरीही कंपनीला पुढे नेण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज होती. गोयल यांनी त्यासाठी 96 टक्के शेअर मुकेश अंबानी यांना देऊ करून यातून मार्ग काढला आहे. अंबानींनी 182 कोटी रुपयांमध्ये ही हिस्सेदारी खरेदी करतानाच आणखी 75 कोटी त्यात टाकण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता ही एक महत्वाची कंपनी म्हणून भारतभरात ओळख पक्की करणार हे निश्चित.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला ९४२२२१५६५८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात फोन करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here