सिब्बल यांचे पुन्हा राहुल गांधींकडे बोट; नेतृत्वाला गांभीर्य नसल्याची केली टीका

बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षामुळे अपयश आल्याची नाराजी राष्ट्रीय जनता दल या पक्षाने व्यक्त केली आहे. तर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही पक्षनेते राहुल गांधी यांच्या मर्यादांवर बोट ठेवले आहे. अशावेळी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनीही पुन्हा एकदा पक्षाला घराचा आहेर दिला आहे.

फक्त बिहार राज्यात नाही तर देशात पोटनिवडणुका झाल्यावरही मतदारांनी काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवरही विजय मिळाला नाही. तीन ठिकाणी तर कॉंग्रेस उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. लोकसभा निवडणुकीतही गुजरात राज्यामध्ये असेच घडले होत. उत्तरप्रदेश राज्याच्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अवघे दोन टक्के मतदान मिळाले. त्यामुळे भारतीय जनमताचा संदेश स्पष्ट आहे, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी म्हटले आहे.

सिब्बल म्हणाले की, बिहारच्या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आलेला नाही. किमान आमच्या कानावर तरी अद्याप काहीही आलेले नाही. सर्वकाही सुरळीत असून बिहारचा पराभव ही सामान्य बाब असल्याचे पक्षनेतृत्त्वाला वाटत असेल. असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील.

काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. आताही सिब्बल यांनीच या महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here