राहुल गांधी म्हणजे ‘नॉन सीरीयस पर्यटक राजनेता’; पहा कोणत्या निमित्ताने भाजपने केली टीका

यंदा प्रथमच निवडणुकीचा निकाल आल्यावर बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर थेट टीका केली आहे. राजद यांचा धागा पकडून भाजपने राहुल गांधी नॉन सीरीयस पर्यटक राजनेता असल्याची गंभीर टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणजे चुका कबुल करून त्यातून मार्ग काढणारे शांत नेते आहेत. मात्र, कोणत्याही निवडणुकीत झपाट्याने उतरणे आणि मतदारांना साद घालण्यात ते अनेकदा कमी पडत आहेत. त्यातच कॉंग्रेस पक्षाला एकहाती आणि प्रेरणादायी असे नेतृत्व देण्यातही ते वेळोवेळी मागे राहिलेले आहेत. त्यातच भाजपने त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करून प्रतिमा मलीन केली आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या राजदने त्यांच्यावर निवडणुकीत योग्य प्रचार न केल्याची टीका केली आहे.

राजदचे नेते शिवानंद तिवारी म्हणाले आहेत की, बिहारच्या निवडणुकीत 70 जागा घेणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने सिरीयस पद्धतीने 70 सभाही घेतल्या नाहीत. उलट त्यांच्या पक्षाचे नेते त्यावेळी शिमला येथे फिरायला गेले होते. कॉंग्रेस पक्षाला जास्त जागा हव्या असतात. मात्र, त्या जिंकून आणण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न हा पक्ष करीत नाही.

हाच धागा पकडून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी राहुल गांधी यांना नॉन सीरीयस पर्यटक राजनेता असे म्हटले आहे. एकूणच या निवडणुकीने राहुल गांधी यांची राजकीय नेता म्हणून असलेली प्रतिमा आणखी खराब होणार असेच दिसत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही अशीच टीका केली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना आता खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण किंवा नेताबदल करावा लागणार असेच चित्र आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here