पदवीधर-शिक्षक आमदारकीसाठी शेकडोंच्या उड्या; पुण्यामध्ये तब्बल 108 तर इतरत्र ‘इतके’ उमेदवार

सध्या राज्यातील राजकीय वातावरण पदवीधर आमदार निवडण्याच्या मुद्द्यावर तापले आहे. अनेकांनी या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांचा आकडा मोठा झाला आहे. पुढील काळात यातले कितीजण रिंगणात उरतात आणि कितीजण अर्थपूर्ण पद्धतीने बाहेर पडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या नाराजांची सुप्त लाट आहे. तर, बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी यापूर्वीच उमेदवारी दाखल केली आहे. मागे घेण्याची तारीख दिवाळीनंतर म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी असून त्यानंतरच सर्व मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल.

औरंगाबाद विभागात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी दाखल केली. त्या दोघांनीही यंदा विजयाचा दावा केला आहे. तर, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सांगलीचे अरुण लाड हे रिंगणात असताना त्यांना भाजपच्या संग्राम देशमुख यांचे आव्हान आहे.

विदर्भातील नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची लढत देतील. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपकडून जितेंद्र पवार आव्हान देतील. अमरावती शिक्षक मतदारसंघात आघाडीकडून शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे तर भाजपकडून डॉ.नितीन धांडे रिंगणात आहेत.

पदवीधर मतदारसंघ
औरंगाबाद ६५
पुणे १०८
नागपूर ३१


शिक्षक मतदारसंघ
पुणे ६७
अमरावती २८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here