म्हणून पालेभाज्यांच्या दरात झाली घसरण; कोथिंबीर चार रुपये जुडी

नाशिक :

आधी कांद्याने वांधा केला आता पालेभाज्यांचे दरातही घट होताना दिसत आहे. कांदापात आणि ईतर १-२ पालेभाज्या वगळता कुठल्याही भाजीला मनाजोगता भाव मिळाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेली आवक ही पालेभाज्यांच्या दरात होणाऱ्या घाट्याला कारणीभूत ठरली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कोथिंबिरीची आवक झाली परिणामी दरात झरकन घसरण होऊन जुडीला ४ रुपये भाव मिळाला.

शुक्रवारी संध्याकाळी नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची आवक 2 लाख 25 हजार जुडी आल्याने किमान दर चार रुपयांवर घसरला. मागील महिन्यात कोथिंबिरीने 150 ते 180 रुपये जुडी असा टप्पा गाठला होता. त्यावेळी आवक 80 ते 90 हजार जुडय़ा होती. आता आवक तिप्पट झाल्याने गावठी कोथिंबिरीला किमान 4, कमाल 12 व सरासरी 8, तर हायब्रीडला अनुक्रमे 5-15-10 रुपये जुडी दर मिळाला. कांदापात वगळता इतर पालेभाज्यांची आवकही दुपटीहून अधिक असल्याने भाव कमी मिळाले.

मेथीची आवक 60 हजार 500 जुडी व दर 5-16-10 असे होते. मागील महिन्यात मेथीची आवक अवघी दहा टक्के होती, तर भाव 60वर पोहचला होता. आता शेपूची आवक 40 हजार 300 व दर किमान 5 मिळाला. दरम्यान फळभाज्यांचे दरही घसरले आहेत. वांगे, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरातही घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात 120 रुपये किलोवर पोहोचलेल्या वांग्यांना सध्या किमान 30 दर मिळत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here