मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट! ‘त्या’ दिवसापासून उघडणार मंदिरे, प्रार्थनास्थळे

मुंबई :

कोरोनाचा प्रकोप काही अंशी नियंत्रणात आला असला तरीही आता जनजीवन पुन्हा रुळावर येत आहे. पर्याय नसल्याने लोकांनी पुन्हा पहिल्यासारखेच परंतु सुरक्षित पद्धतीने जगण्याचे ठरवले आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहे. विविध सार्वजनिक ठिकाणे उघडली जात आहेत. आता दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला मोठी भेट दिली आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर केले आहे.

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले.

राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असेही पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रींची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here