‘त्या’ आधारावर आरक्षण नको, ही शिवसेनेची भूमिका; संजय राऊत म्हणाले, मराठा आरक्षण…

मुंबई :

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अशातच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘जातीच्या आधारावर आरक्षण नको’, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगितले आहे. राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे, सरकार त्यावर निर्णय घेईल, यावर बोलणं योग्य नाही, बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाची भूमिका होती जातीच्या आधारावर आरक्षण नको, कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, आर्थिक निकषावर आरक्षण हवं ही शिवसेनेची भूमिका आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी सवालही उपस्थित केला. ते म्हणाले की, मुस्लिमांमध्ये कोणी मागासवर्गीय असेल त्यांनाही आरक्षण मिळायला हवं, मराठा समाजात कोणी मागास असेल तर त्यांना आरक्षण मिळायला हवं. इतकचं नव्हे तर दलितांमध्ये जे कोणी वर्षोनुवर्ष आरक्षण घेऊन उच्चपदावर पोहचलेत त्यांनी आरक्षण सोडायला हवं. पोटाला जात आणि धर्म नसतो. जातीवाद संपवावा हे आम्हाला वाटतं, पण संपवणार कोण?

पुढे बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या भेटीविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंवर त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंचा प्रभाव होता, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या प्रेरणेनेच झाली, शिवसेनेचं नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं आहे. बाळासाहेबांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते. राजकारणात कोणी दुश्मन नाही, विचारधारा वेगळी असू शकते, शरद पवार आमच्याविरोधात होते, तरीही आम्ही भेटत होतो, संधी मिळेल तेव्हा सर्व राजकीय नेत्यांना मी भेटतो, देवेंद्र फडणवीस आमचे दुश्मन नाही, विरोधी पक्षनेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत काम केले आहे, राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना स्थान मिळेल, विरोध होत असतो पण तलवारी काढून विरोध होत नाही. मी पत्रकार आहे, संपादक आहे त्यामुळे मुलाखतीसाठीही मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो असा खुलासा संजय राऊत यांनी केला.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here