‘हे’ही गुण-अवगुण लागतात राजकारणासाठी; वाचा खास माहिती पॉलिटिकल बिजनेसची

आपण अगोदरच्या लेखात पाहिले की राजकारण नावाच्या महाकुंभात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण लागतात. जसे काही चांगुलपणाचे गुण लागतात. तसेच गुण उधळण्याची किमयाही राजकारण्यांना साधावी लागते. कारण, असे काही अवगुण असतात ज्यामुळे राजकारणात आपल्याला निवडणूक जिंकता येते आणि मोठी पद मिळवता येतात. भारतात असे अवगुण हेच गुण मानले जातात.

ज्याच्यामध्ये असे गुण उधळण्याची क्षमता जास्त तो सर्वात मोठा पुढारी असेच चित्र भारतात आहे. एकूण भारतीय जनेतेची राजकीय गोडी आणि त्यांना लागणारे नेते लक्षात घेता किमान ५० वर्षे तरी अजूनही हेच गुण आणि अवगुण पुढाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. आम्ही हे जे काही लिहिले आहे ते आपल्या गावातील सरपंच, सोसायटी चेअरमन, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सभापती, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री आणि त्यापुढील सर्वच पदांसाठी १०० टक्के लागू होतात की नाही तेही कळवा. तर वाचा कोणते गुण उधळावे लागतील ते.

 1. कुठलेही विकास काम हे टप्प्याटप्प्याने करा. कारण आपल्या जनतेस हप्त्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे एकदम काम करून स्वत:चे नुकसान करून घेऊ नका.
 2. मतदारांना कायम भीती दाखवा. त्यांच्यावर कायम दबाव असला पाहिजे. त्यांच्यावर असणार्या संकटांचे तुम्हीच तारणहार आहात, ही जाणीव त्यांच्यात निर्माण करा.
 3. राजकारण हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने कधी काहीही होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. वादग्रस्त प्रतिक्रिया देऊ नका. संवेदनशील विषयांत प्रतिक्रिया देण्याचे टाळावे, म्हणजे होणारे नुकसान टळते.
 4. दररोजची वर्तमानपत्रे आवर्जून वाचावीत. स्थानिक, राज्य आणि देश पातळीवरील बातम्यांचे नियमित वाचन करावे. ते संदर्भ लक्षात असू द्या. भाषणात उपयोगी पडतात. चांगले वकृत्व असेल तर नेतृत्वाची माळ आपोआप तुमच्या गळ्यात पडते.
 5. इतरांना कमी लेखू नका. दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन आपण जास्त लांब उडी मारू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. जास्तीतजास्त मित्र जोडा. टीकात्मक बोलून शत्रुत्व ओढवून घेऊ नका. एखाद्या बद्दल चांगले बोलता आले नाही तरी चालेल पण वाईट बोलू नका. गप्प बसा.
 6. मदत करणार्यांचे आभार मानायला शिका. शब्दांची अजिबात कंजुषी करू नका. आभार मानून इतरांच्या मनात स्थान निर्माण करा. ही छोटी वाटणारी गोष्ट लाख मोलाची आहे.
 7. सौजन्यशील रहा. सौजन्याने विरोधकांना आपलंस करा. एक विरोधक कमी करणे म्हणजेच एक मित्र जोडणे. अर्थात एक मित्र गमावणे म्हणजेच एक विरोधक वाढविणे.
 8. स्वतःच स्वताचे कौतुक करू नका. इतरांनी तुमचं कौतुक करावं, यासाठी समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींना प्रेरित करा. हेच लोकं तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीत मदत करतील.
 9. मतदारसंघाला मंदिर आणि मतदाराला देव माना. मतदारांच्या मनात स्थान निर्माण करा. व्यक्तिगत वजन वाढवा. पक्षनेतृत्वाला दहा वेळा विचार करावा लागेल, अशी प्रतिमा तयार करा.
 10. नेहमी तीच ती आश्वासने देऊ नका. वेगवेगळी आश्वासने निरनिराळ्या पद्धतीने देत जा. जनतेला एकदा मूर्ख बनविता येते, वारंवार नाही.
 11. प्रसंग व वेळेचे गांभीर्य लक्षात घ्या. प्रसंगी युती करा. पण विजय आपलाच झाला पाहिजे, हे लक्षात असू द्या.
 12. वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. हरेक गोष्टीची नोंद ठेवा. वेळेत कामे करा. एखाद्या ठिकाणी उशिराने गेलात तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा. दिलेली वेळ पाळा.
 13. वृद्ध, मध्यमवर्गीय लोकांनी काळाच्या ओघात विचारसरणी स्वीकारलेली असते. सहसा ते बदलायला तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनपरिवर्तन करण्यात वेळ घालवू नका. सोयीस्करवादी विचार अंगीकारावेत. तरून मतदार  नेहमीच नाविन्याच्या शोधात असतात. त्यांना आकर्षित करून घ्या.
 14. डोळे सताड उघडे ठेवा. आजूबाजूच्या समस्या हीच खरी संधी असते. त्या सोडवून जनतेचा विश्वास संपादन करा.
 15. माणसं बघून कामे करा, कामे करून माणसं बघत बसू नका.
 16. नेत्याला ‘साहेब’ तर कार्यकर्त्याला ‘राजा’ म्हणायला शिका. एक दिवस तुम्हालाही ‘राजा’ आणि ‘साहेब’ बनण्याची संधी मिळेल.
 17. तुम्ही किती वजनदार आहात हे महत्वाचे नसून तुमच्या सोबत वजनदार माणसे असणे आवश्यक आहे.
 18. सतत नवीन संकल्पना अंमलात आणा.
 19. आपला स्वभाव हेच आपलं भविष्य ठरवते, त्यामुळे स्वभाव बदला, भविष्य अपोआप बदलेल.
 20. जोखीम पत्करायला शिका. संधी निर्माण कराव्या लागतात. टप्प्यात येताच संधीचा लाभ घ्या.
 21. निंदा अशी करा की, कौतुक वाटायला हवी. तर कौतुक असे करा की वास्तव समोर यायला हवे.
 22.  बिनकामाची माणसे जवळ बाळगू नका, त्यांच्यामुळे कोणताही फायदा होत नसतो, उलट तोटाच होतो.
 23. अशा रीतीने तुम्ही स्वबळावर निवडून याल, अशी परिस्थिती निर्माण करा. मग पक्ष आणि नेते तुमच्या दारात येतील.

वर सांगितल्याप्रमाणे जर नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही तयारी केली तर राजकारणात तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाहीत.

संपादन : महादेव पांडुरंग गवळी

संचालक, स्टार प्रो आणि संपादक, साप्ताहिक राज्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here