राऊतांचा सोमय्यांना इशारा; खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं अन्यथा…

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान ठाकरे कुटुंबावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही काही बोलावं, असं कोणतंही महान कार्य त्यांनी केलेलं नाही, असा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी हाणला आहे.

पुढे राऊत यांनी म्हटले की, किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरुन काढता येतात. पण आम्ही उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा गंभीर इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला.

दरम्यान ‘किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही’, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

आता सोमय्या हे शिवसेना नेत्यांच्या रडारवर आलेले आहेत. ‘अन्वय नाईक यांच्यासोबत २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी औलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र’, असे ट्वीट करत राऊत यांनी शिवसेना स्टाईल इशारा सोमय्यांना यापूर्वीच दिला होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here