राकेश झुनझुनवालांची ‘दिवाळी शॉपिंग’; ‘या’ कंपनीच्या 50 लाख शेअर्सची केली खरेदी आणि ‘या’ शेअर्समध्ये वाढवली हिस्सेदारी

मुंबई :

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या  रेयर एंटरप्राइजेज या कंपनीने इंडियाबुल्स रिअल इस्टेटमध्ये 50 लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. त्या बदल्यात कंपनीला इंडियाबुल्समध्ये 1.1 टक्के हिस्सा मिळेल. झुनझुनवाला यांनी खुल्या बाजारातील व्यवहारांमधून 1.1 टक्के इक्विटी भागभांडवल मिळविले आहे. गुरुवारी इंडियाबुल्स रिअल इस्टेटचे शेअर्स जवळपास 14 टक्क्यांनी वाढून 54.95 रुपयांवर बंद झाले.

राकेश झुनझुनवाला या कंपनीच्या रेयर एंटरप्रायजेसने इंडियाबुल्स ग्रुपच्या मालकीच्या रिअल इस्टेट कंपनीचे 50 लाख इक्विटी शेअर्स प्रति शेअर  57.73  रुपये किंमतीने विकत घेतले. एनएसईवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून ही माहिती घेण्यात आली आहे. रेयर इंटरप्राइजेजने खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य  28.86 कोटी रुपये होते.

आज, इंडियाबुल्स रिअल इस्टेटचे शेअर्स 12 टक्क्यांनी वधारले आहेत आणि 61.70 रुपयांच्या किंमतीवर पोहोचले आहेत. काल हा शेअर 14 टक्क्यांनी वाढून 55.10 रुपयांवर बंद झाला. राकेश झुनझुनवाला यांनी अलीकडेच Va Tech Wabag लिमिटेड आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सचा समावेश त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये केला होता. झुनझुनवालाने ‘वे टेक वबाग लिमिटेड’चे 50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत आणि कंपनीमधील त्यांचा हिस्सा 8.04 टक्के आहे. सध्याच्या किंमतीनुसार या शेअरची एकूण किंमत 92.2 कोटी रुपये आहे.

या व्यतिरिक्त राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच टाटा मोटर्स या ऑटो कंपनीत 1.29 टक्के भागभांडवल खरेदी केले. त्याने कंपनीचे 4 कोटी शेअर्स खरेदी केले. यामुळे, ते टाटा कंपनीमधील प्रमुख माइनोरिटी स्टेकहोल्डर्समध्ये सामील झाले आहेत. सध्याच्या शेअर्सच्या किमतीनुसार झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 605 कोटी रुपये आहे. राकेश झुनझुनवाला यांनी एनसीसी लिमिटेडमधील शेअर्समध्ये 0.६९ टक्क्यांनी, अ‍ॅग्रो टेक फूडमध्ये 2.87 टक्क्यांनी, जुबिलेंट लाइफ सायन्समध्ये 0.63 टक्के व ल्युपिनमध्ये 0.06 टक्क्यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here