‘त्या’ क्षेत्रातही महाराष्ट्राने मारली बाजी; महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण

मुंबई :

जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. जलसंपत्ती नियमनात राज्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकाविले असून विविध क्षेत्रात एकूण ६ पुरस्कार पटकाविले आहेत. सांगली जिल्ह्याला नदी पुररूज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार 11 व 12 नोव्हेंबर असे दोन टप्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख बॅरी. विनोद तिवारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते, प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने देशातील ‘सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण’ या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here