‘ते’ केल्याशिवाय सोमय्यांची बेताल बडबड थांबणार नाही; ‘या’ शिवसेना नेत्याचा इशारा

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान ठाकरे कुटुंबावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही.  ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे.

आता सोमय्या हे शिवसेना नेत्यांच्या रडारवर आलेले आहेत. ‘अन्वय नाईक यांच्यासोबत २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी औलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र’, असे ट्वीट करत राऊत यांनी शिवसेना स्टाईल इशारा सोमय्यांना दिला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here